पुणे : पुण्यातील मटका किंग नंदू नाईक यांच्या शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत ८ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून त्यांचे मोबाईल आणि रोख रक्कमेसह तसेच जुगाराच्या साधनांसोबतच २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अनेकवेळा छापे टाकल्यानंतर देखील नंदू नाईक यांचे मटक्याचे अड्डे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
संतोष लक्ष्मण गुजर (वय-५२, रा. शिवाजीनगर गावठाण), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय-४२, रा. पिरंगुट), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय-४३, रा. सासवड), राजू बबनराव गोरे (वय-३२, रा. पिरंगुट), किसन दत्तात्रय तावरे (वय-४३, रा. पिरंगुट), रोहन किसन तावरे (वय-१९, रा. धाराशिव), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय-५२,रा. सांगवी), नंदकुमार बाबुराव नाईक (वय-७६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक हा मटका किंग या नावाने ओळखला जातो. त्याचे पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असतात. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाच्या पाठीमागे मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मिळाली आहे. त्यावरून, त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, त्यानुसार पोलीस पथकाने शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंग येथे छापा टाकला आहे. त्यावेळी कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया देण्यात येत होत्या. आरोपींकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख रक्कम, तसेच जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.