लोणी काळभोर, ता. 9 : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमधून अवैध देशी दारूचा साठा करून विक्रीचा पर्दाफाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून सोमवारी (ता. 7) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या छाप्यात मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहीम खान शब्बीर पठाण (वय-32, जि.प. शाळेच्या मागे कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अंकुश गणपत घुले (वय 26) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश घुले हे पोलीस अंमलदार असून ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रायबोले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्य बजावीत असताना, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अमित बिर्याणीच्या शेजारील बोळीत अवैध दारू विक्री केली जात आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी रहीम पठाण हा त्याच्या ओळखीच्या लोकांना अमीत बिर्याणी हॉटेलच्या बोळात अनधिकृतपणे दारू विकताना आढळून आला. पोलिसांनी या छाप्यात वेगवेगळ्या देशी दारूच्या सुमारे 1155 रुपये किंमतीच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी रहीम पठाण याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिशन अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादा हजारे करीत आहेत.