पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना, तसेच अमली पदार्थ तस्करी, धमकी देऊन लूटमार आणि मारहाणीच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. आता या प्रकरणी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. ज्या भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, त्या भागांचे ‘मॅपिंग’ करा, असे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
पुण्यात दहशत माजवून वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. येरवडा, मुंढवा यासह पुण्यातील काही भागात मागील काही दिवसात वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, अशी भूमिका आता पुणे पोलिसांनी घेतली आहे. या घटनांशी संबंधित आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशत माजवून वाहनांची तोडफोड
गेल्या काही दिवसापूर्वी कोयता गँगच्या गुंडांनी येरवडा परिसरात उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धमकावण्यास सुरुवात केली होती. आरोपींच्या हातात कोयता तसंच हॉकी स्टिक असल्यानं नागरिक चांगलेच घाबरले होते.