लोणी काळभोर, ता. 13: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी हवेली तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. या दौऱ्यात रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटनस्थळांच्या सुविधा यांसारख्या विविध प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
दौऱ्याची सुरुवात श्रीक्षेत्र थेऊर येथील थेऊर ते काकडे मळा या रस्त्याच्या पाहणीपासून झाली. या रस्त्यालगत उच्चदाब व अतिउच्चदाब विद्युत वाहिनीचे पोल असल्यामुळे कामात अडथळा येत असल्याचे, स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. हे ऐकून घेऊन, आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत युद्धपातळीवर पोल स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले. कामात दिरंगाई झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
यानंतर त्यांनी थेऊर गणपती मंदिर परिसरातील वाहनतळाच्या सध्याच्या स्थितीची पाहणी केली. येथे वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेता नवीन वाहनतळाच्या उभारणीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुळा-मुठा नदीकाठच्या सती रमाबाई समाधीस्थळाची पाहणी करून, या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी आवश्यक सुधारणा करण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
पुढे प्रयागधाम येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना त्यांनी स्थानिक अडचणी जाणून घेतल्या. काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर हिंगणगाव येथे PMRDA कडून मंजूर झालेल्या नदीवरील पुलाच्या जागेची पाहणी करण्यात आली.
उरुळीकांचन येथे पुणे-सोलापूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येचा आढावा घेण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण यांनी वाहतूक व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर महामार्गालगतच्या अतिक्रमणांची पाहणी करत अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शेवटी, पांढरस्थळ येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेऊन, दौंड तालुक्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी डाळिंब देवस्थानकडे रवाना झाले.
या दौऱ्यात PMRDA चे मुख्य अभियंता अशोक भालकर, अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता शितल देशपांडे, उपअभियंता सुभाष मोरे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आतकरे, विद्युत उपअभियंता मनोज जगताप, कनिष्ठ अभियंता प्रशांत सावंत तसेच थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, कोरेगावमुळचे विठ्ठल शितोळे, प्रयागधाम ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.