पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) रातराणी बसचे वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केला आहे. बस वाहक आणि चालकांसाठी रातराणी बसवरील कामाची वेळ रात्री साडेनऊ ते सकाळी सहा अशी करण्यात आली आहे. येत्या १८ डिसेंबरपासून हा बदल लागू होणार आहे.
पीएमपीकडून प्रवाशांना आवश्यकता असलेल्या पाच मार्गावर सध्या रातराणी बस चालविल्या जात आहेत. या बस साधारण एक ते दीड तासाने मार्गावर धावत आहेत. प्रत्येक मार्गावर साधारण आठ फेऱ्या बसच्या होत आहेत. सध्या सुरू असलेल्या रातराणी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच रातराणी बसला पाच रूपये तिकीट दर जास्त घेतला जात आहे.
दरम्यान, रातराणी बसमुळे स्वारगेट, पुणे स्टेशन येथून प्रवास करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. चालकांनी देखील बस सुटणाऱ्या स्थानकावर उभे राहून आवाज देत प्रवाशांना बोलवावे, अशा सूचना पीएमपीकडून करण्यात आल्या आहेत.