PMP Strike | पुणे : पैसे थकवल्याच्या कारणावरुन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ठेकेदारांनी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे ठेकेदारांच्या संपाचा धसका पीएमपीने घेतला आहे. या भीती पोटी पीएमपीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
बसचे भाडे आणि इंधनाचे पैसे दररोज दिले जाणार….
पीएमपीकडून एप्रिलपासून ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसचे भाडे आणि इंधनाचे पैसे दररोज दिले जाणार आहेत. ठेकेदाराचे पैसे जास्त थकू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
पीएमपीला दिवसाला तिकीट व पासच्या माध्यमातून सरासरी दीड कोटी रूपये उत्पन्न मिळते. त्यानुसार मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च भागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्याचे पहिले दहा दिवस कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च उत्पन्नातून भागविला जाणार आहे. त्यानंतर महिन्याच्या 11 ते 30 तारखेदरम्यान ठेकेदारांचे व सीएनजीचे पैसे दिले जाणार आहेत. त्यापैकी दररोज 73 लाख रुपये एमएनजीएलला दिले जातील. तर, 44 लाख रूपये ठेकेदारांना बसनुसार दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून मिळालेल्या संचालन तूटीतून दिली जाणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण 1700 बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यामधील एक हजार बस या भाडेतत्वावरील असतात. या बसला पीएमपीकडून किलोमीटर प्रमाणे भाडे दिले जाते. त्याबरोबरच पीएमपीच्या सर्व बसला दिवसाला साधारण 86 हजार किलो सीएनजी लागतो.
आतापर्यंत पीएमपीकडून ठेकेदारांनाबसचे व सीएनजीचे पैसे महिन्याला दिले जात होते. कधी-कधी तीन महिने पैसे थकत होते. त्यामुळेच बस ठेकेदारांकडून मार्च महिन्यात संप देखील करण्यात आला होता. त्याचा फटका प्रवाशांना बसला होता. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ठेकेदार व सीएनजीचे पैसे दिवसाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!