लोणी काळभोर, (पुणे) : एकेरी वापरातील प्लास्टिकमुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याने सरकारने त्यावर बंदी घातली. मात्र, पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील चौकात, ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या सर्रास रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत फेकल्या जात आहेत. बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करताना कोणी आढळले तर दंड होतो. पण, हा नियम येथे कागदावरच असल्याचे चित्र आहे. या प्लास्टिकचा वापर मुक्या प्राण्यांच्या जीवनमानावर होतो. फेकलेल्या अन्नासोबतच जनावरे प्लास्टिक खात असल्यामुळे ती आजारी पडणे, तसेच दगावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे.
लोणी स्टेशन व परिसरातील काही नागरिक शिळे अन्न, खराब भाजीपाला सकाळी उठून विल्हेवाट लावतात. त्यासाठी सकाळी खराब भाजीपाला, टाकाऊ पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून मोकळ्या जागेत फेकून देतात. त्यात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचाही समावेश असतो. भुकेपोटी मोकाट जनावरे, प्राणी हे खाद्यपदार्थ खातात. परंतु, हे खाद्यपदार्थ खाताना त्यासोबत त्यांच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्याही जात आहेत.
लोणी काळभोर, उरुळी कांचनसह शहरात विविध ठिकाणी गायी, म्हशी, बकऱ्या आणि श्वानांसह इतर प्राण्यांची भटकंती सुरू असते. मुळात मालकांनी जनावरांना रस्त्यावर मोकळे सोडले तर भुकेली जनावरे जिथे मिळेल तिथे रस्त्यावर फेकलेले अन्न खातात. अनेक नागरिक गायी, म्हैस अथवा जनावरे दिसल्यानंतर उरलेले अन्न, शिळ्या पोळ्या, शिळा भात इतकेच तर काहीजण बुरशी आलेले अन्न देखील देतात. असे अन्न खाल्ल्याने गायी, म्हशी किंवा अन्य प्राण्यांना विषबाधा होऊ शकते. त्यामुळे अशी जनावरे दगावू शकतात.
प्लास्टिक बंदी होऊनही सर्रासपणे होतोय वापर
शासनाने प्लास्टिक बंदी केली असली तरी परिसरात व परिसरातील दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या मिळत आहेत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. रस्त्यावर कचऱ्यांच्या ढिगात आणि सर्वत्र प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर आढळून येते. खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या कॅरिबॅगमधून फेकून दिले जाते. अशा कॅरिबॅगा जनावरे खातात, त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कॅरिबॅग खाल्ल्याने सातत्याने जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
निसर्ग वाचविण्याची गरज
प्लास्टिकच्या गोळ्यामुळे जनावरांच्या अन्ननलिकांसह श्वसनक्रियेचे काम थांबते. त्यातून पचनसंस्था ठप्प होते. त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडत आहेत. हा प्लास्टिक पिशव्यांचा भस्मासूर थांबवून निसर्ग वाचविण्याची गरज असल्याचे दिसत आहे.
…तर मुक्या जनावरांच्या जीवावर बेतू शकतं
अनेकदा भुकेपोटी जनावरे अन्नामध्येच दिलं गेलेलं प्लास्टिकही नकळतपणे खातात. प्लास्टिक पोटात गेल्यानंतर ते विरघळत नाही. त्यामुळे हे प्लास्टिक असे पोटात जाते. असे सातत्याने घडल्यास जनावरास पचनास त्रास होतो. त्याचबरोबर त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. एका ठिकाणी बांधलेल्या जनावरांमध्ये याचे अल्प प्रमाण दिसून येते. पण भटक्या जनावरांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर या मुक्या जनावरांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन लोणी काळभोर पशूवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर नीता लाडूकर यांनी केले.