लोणी काळभोर, (पुणे) : मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्र किंवा तीर्थक्षेत्री असलेल्या जलप्रवाहात विसर्जित करण्याची परंपरा आहे. याला फाटा देऊन कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धुमाळ कुटुंबियांनी सर्व अस्थी नदीपात्रात विसर्जित न करता पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी जमिनीत खड्डा घेऊन त्यावर केशर आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण केले आहे.
कुंजीरवाडी येथील श्रीमती गजराबाई बबन धुमाळ यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (ता. 27) निधन झाले. आपल्या आईच्या स्मृती कायम जोपासल्या जाण्यासाठी कुटुंबियांनी अस्थी विसर्जित करण्याऐवजी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्याला नातेवाईक व कुटुंबीयांनी पाठिंबा दिला.
वृक्षारोपण प्रसंगी मुलगा यशवंत सहकारी साखर कामगार पतपेढीचे उपाध्यक्ष नंदकुमार धुमाळ, थेऊर गावच्या माजी सरपंच छायाताई काकडे, उरुळी कांचन वि वि का सोसायटीच्या उपाध्यक्षा नंदा कांचन, तसेच महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघाचे सचिव गोरख घुले व कुटुंबीय उपस्थित होते. दरम्यान, या वृक्षाची निगा राखणे व जोपासना करणे हिच आईंना श्रद्धांजली असेल अशी भावना धुमाळ कुटुंबियांनी व्यक्त केली.