पुणे : विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क येथे पशुखाद्य आणण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तिचे अपहरण करून, गुजरातच्या गोध्रा येथे नेऊन डांबून ठेवत, विकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दरम्यान, संबंधित तरुणीने प्रसंगावधान राखत हुशारीने स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसांच्या मदतीने पुणे गाठले. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात कमला नावाच्या एका महिलेसह पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपह्रत तरुणी येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमध्ये वास्तव्यास आहे. पीडित तरुणी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जवळच टिंगरेनगर येथे पशुखाद्य आणण्यासाठी गेली होती. पशुखाद्य घेऊन दुचाकीवरून ती जेलरोड चौकीकडे जाणाऱ्या विमानतळ रस्त्यावर असलेल्या संजय पार्क जवळून येत होती. त्यावेळी संजय पार्कमधून एक रिक्षा भरधाव वेगात त्यांच्यासमोर आली आणि त्यांच्या दुचाकीला एका बाजूला घेतले.
यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जाब विचारण्यासाठी दुचाकी थांबवली. त्याचवेळी एक रिक्षाचालक खाली उतरला व पांढऱ्या रंगाची एक कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्यामधून दोघे उतरले. त्यांनी फिर्यादी तरुणीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले आणि तिच्या तोंडाला रुमाल बांधून तेथून पळ काढला. तरुणीने स्वतःची सुटका करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी तिला इंजेक्शन दिले आणि दिवसभर एका खोलीत डांबून ठेवले. या खोलीत असलेल्या कमलाबाई नावाच्या महिलेने ‘तेरे को भी ऐसाच रहना होगा, दुसरी जग तेरा सौदा करने वाले है’ असे म्हणत आरोपींना ‘इसको संभाल के ले जाना’ असे सांगितले. आरोपींनी तिचे हातपाय बांधून दुसऱ्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसवले आणि फिर्यादीला गाडीमधून घेऊन गेले.
दरम्यान, तरुणीला घेऊन जाणारी गाडी महामार्गाला लागल्यानंतर लघुशंकेला जाण्याचे निमित्त तिने सांगितले. त्यावेळी आरोपींनी तिचे बांधलेले पाय काही काळासाठी सोडले. लघुशंकेसाठी खाली उतरलेली तरुणी या संधीचा फायदा उठवत जवळच असलेल्या जंगलामध्ये पळाली आणि लपून बसली. आरोपींनी बराच वेळ तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे शोध घेऊन आरोपी निघून गेले. एखाद्या बाॅलीवूडपटाला लाजवेल, असे कथानक या तरुणीसोबत घडत होते. पीडित तरुणी काही वेळाने रस्त्यावर आली आणि स्थानिक लोकांना तिने घडलेला प्रसंग सांगितला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. त्यावेळी तिला आपण गुजरातमधील गोध्रा येथे असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांनी तिला रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर ती पोलिसांच्या मदतीने पुण्यामध्ये आली.
दरम्यान, घरातून निघालेली तरुणी बराच वेळ घरी न परतल्याने, कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, काळजीत असलेल्या नातेवाईकांनी तरुणी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो विमानतळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज वारंगुळे करीत आहेत.