पुणे : पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात धडक कारवाई केलेली असली, तरी हल्ले सुरुच आहेत. रविवारी रात्री याची प्रचिती आली. रविवारी सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना पुणे शहरात गोळीबार झाला. या घटनेत एक जण गंभीर झाला. पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्व परिसर हादरला होता.
किरकोळ वादातून एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखत गोळी झाडली. दरम्यान, या घटनेनंतर काही तासांत शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली. सिनेस्टाईल पाठलाग करत कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. एखाद्या बॉलीवूडपटाला शोभेल असा थरार शहरात घडला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार झाला. आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्या रविवारी मध्यरात्री किरकोळ वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर गोळी चालवली. गोळीबारामुळे आकाश बाणेकर जखमी झाला. त्याला कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणी रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै महिन्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार झाला आहे.
शहरात घरफोडीच्या घटना सुरूच
शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दिवाळीच्या दिवसांत पुण्यातील घरे बंद असल्याचा फायदा घेत अनेक भागांत घरफोड्या झाल्या. सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली. पुण्यातील केशवनगरमध्ये घरफोडीत १३ लाखांचा ऐवज चोरी झाली. या प्रकरणी गोपाल झा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसरीकडे कर्वेनगर भागात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून ३० हजारांची रोकड लंपास केली.