भिगवण,ता.१९: इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावात ‘पिरसाहेब राज बाग सवॉर’ यात्रेनिमित्त राज्यातून अनेक भाविक दर्शनाला येत असतात. महत्त्वाचे म्हणजे पिरसाहेब यांच्या दर्शनाला सर्व जाती-धर्माचे लोक मोठ्या भक्तीने येत असतात. विशेषतः या यात्रेच्या सोहळ्यामध्ये हिंदू-मुस्लीम बांधवांचे ऐक्य पाहायला मिळते हे या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे. पिरसाहेब यांची यात्रा मुख्य २ दिवस चालते. हिंदू-मुस्लीम या दोन्ही धर्माच्या नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पिरसाहेबांच्या यात्रेची सुरुवात पारंपरिक पध्दतीने वाद्याच्या गजरात ‘संदल’ची मिरवणूक काढून केली जाते. त्यानंतर फुलांची चादर तसेच मलिदाचा नैवद्य दाखवला जातो. या यात्रेत सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी होत असतात. ग्रामपंचायतीने तसेच यात्रा कमिटीने ऊरुसानिमित्त धार्मिक, प्रबोधन कार्यक्रम व कुस्त्याच्या आखाड्याचे नियोजन करून जय्यत तयारी केली आहे
पिरसाहेब महाराज यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.२०)रोजी सायंकाळी ६ वा महाप्रसाद व त्यानंतर गावातून संदल निघणार आहे. शुक्रवारी (दि.२१ ) रोजी रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत छबीन्याची ग्रामप्रदिक्षणा निघेल.रात्री १२वा नमिता पाटील निर्मित ‛पाव्हणं तुम्ही म्हणाल तसं’ हा ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. शनिवारी (दि.२२) रोजी सकाळी हजेरीचा स्वरसंगम हा ऑर्केस्ट्रा ठेवला असून सायंकाळी ४ वा जंगी कुस्त्यांचा आखाडा होईल.
रविवार (दि.२३) रोजी रात्री ९ वाजल्यापासून खास महिलांसाठी ‛तुझ्यात जीव रंगला’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तक्रारवाडी ऊरुसामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भिगवण पोलीस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.