Pimpri News : पिंपरी : पायाने ७५ टक्के दिव्यांग. चालताना प्रचंड त्रास. मात्र, तीच मुलगी स्विमिंग टँकमध्ये उतरली की जलपरी बनते. स्विमिंगची अशी कोणती स्पर्धा नाही की त्याच्यामध्ये तिने सुवर्ण यश मिळवले नाही. सलग नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, कॉमनवेल्थ गेम्स २०१८, पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवले. धडधाकट खेळाडूलाही लाजवेल अशी कामगिरी पॅरालिम्पिक जलतरणपटू वैष्णवी विनोद जगताप हिची आहे.
शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान
वैष्णवीला नुकताच राज्य सरकारकडून सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. (Pimpri News) संघर्षातून तिने यश खेचून आणले. वैष्णवी ही जन्मापासूनच दिव्यांग आहे. स्पायना बायफिडा या आजाराने ती ग्रस्त आहे. फिजिओथेरपिस्टच्या सांगण्यावरून उपचाराचा भाग म्हणून ती तीन वर्षांची असताना तिच्या आई वडिलांनी तिला स्विमींगसाठी घेऊन गेले. पुढे तिला स्विमींगमध्ये प्रशिक्षित करणारे अभिजित तांबे भेटले. तेथूनच तिचा खेळाडू बनण्याचा प्रवास सुरु झाला.
आई-वडिलांकडून प्रोत्साहन
वैष्णवी सांगते की, ती दिव्यांग आहे म्हणून तिला वेगळी वागणूक आणि तिच्या बहिणीला वेगळी वागणूक, असे घरात कधीच झाले नाही. चांगल्या कामगिरीचे कौतुक आणि चूक झाली की ओरडा ही ठरलेलं. (Pimpri News) आपल्या मम्मी-पप्पांनी आपल्याला स्विमिंगच्या स्पर्धेसाठी प्रेरित केले. मी डेक्कन येथील टिळक टँकमध्ये प्रॅक्टिस करते. मला पप्पाच तेथे सोडण्यासाठी येतात.
खर्चाचा सर्व भार कुटुंबावर
वैष्णवी ही जरी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली असली तरी तिला अजूनही कुठलेही प्रायोजकत्व मिळालेले नाही. तिच्या सर्व खर्चाचा भार हे तिचे कुटुंबीयच उचलतात. (Pimpri News) वैष्णवी हिने सरकारी नोकरीसाठी खेळाडूंच्या कोटातून क्लेम करून ठेवले आहे. नुकतीच त्याविषयीची पुढील कागदपत्रे देखील तिने संबंधितांना दिली आहेत.
माझे लक्ष्य एशियन्स गेम्सच्या तयारीत
२०१२ मध्ये मी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. तेथे मिळालेल्या यशाने मला माझ्या क्षमतांची जाणीव झाली. आता माझे सारे लक्ष्य हे एशियन्स गेम्सच्या तयारीमध्ये आहे. (Pimpri News) माझ्या यशाचे सारे श्रेय हे मम्मी, पप्पा आणि माझे प्रशिक्षक अभिजित तांबे यांचेच आहे. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे ही चांगली कामगिरी करु शकले.
– वैष्णवी जगताप, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरणपटू
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा मावळ, लोणावळ्यात निषेध
pimpri News : इंदापुरच्या ऋषिकेश अरणकल्ले यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान