पिंपरी : “मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध असतो!” असे विचार ज्येष्ठ लोककवी प्रा. विजय पोहनेरकर यांनी वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर, भोसरी येथे व्यक्त केले. कवयित्री वंदना इन्नाणी लिखित ‘मन आभाळ आभाळ’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. विजय पोहनेरकर बोलत होते.
पुढे म्हणाले की, मन कधी झाकोळतं, कधी भरून येतं, तर कधीकधी भरभरून कोसळतंही! कवयित्री वंदना इन्नाणी यांचं मन आभाळाएवढं आहे! रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या ‘वड म्हणाला, बाई तुला हात जोडले!’ या कवितेच्या सादरीकरणाने रसिकांना खळखळून हसवले. तर ‘संध्याकाळ’ आणि ‘जिंदगानी’ या गेयकवितांनी अंतर्मुख केले.
कवयित्री वंदना इन्नाणी यांनी आपल्या मनोगतातून, “समाजाच्या हिताची जोपासना करणे हाच माझ्या दृष्टीने ‘साहित्य’ या शब्दाचा अर्थ आहे. वडिलांच्या संस्कारांमुळे मी घडली असून आतापर्यंत आणि यापुढेही साहित्यकृतींमधून मिळणारा संपूर्ण निधी सामाजिक कार्यासाठी प्रदान करणार आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘कवी विचार मंच शेगाव’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संयोजनात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने कार्यक्रमाचे संयोजन केले. गणेश लिंगडे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश इन्नाणी यांनी आभार मानले.
सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, उद्योजक सुदाम भोरे, प्रा. दिगंबर ढोकले, कवयित्री रजनी अहेरराव, संगीता वेताळ, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोज मराठे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. तसेच साहित्यिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कार्यक्रमात उपस्थिती होती.