पिंपरी-चिंचवड : मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात एका महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री उघडकीस आली होती. मंत्रा मोमेंट्स सोसायटीच्या व्यावसायिक कार्यालयासमोर ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. महिलेची ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहराही विद्रूप करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा एम.आय.डी.सी. भोसरी पोलिसांनी २४ तासांच्या आत उलगडा केला असून, महिलेच्या पतीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मृत महिलेची ओळख प्रियंका आकाश कांबळे अशी पटली आहे. तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने पती आकाश ऊर्फ घाऱ्या रमेश कांबळे याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या कृत्यात त्याला अन्य तीन साथीदारांनी मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती आहे.

महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. त्यानंतर आकाश कांबळे आणि त्याचे साथीदार प्रथम कांबळे, रोहित शिंदे व दिनेश वाघमारे यांना अटक करण्यात आली.

अटकेनंतर चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कालावधीत पोलिसांकडून गुन्ह्याशी संबंधित अधिक तपास केला जाणार आहे. चारित्र्यावरील संशयातून पत्नीची हत्या केल्याचा आरोप समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.







