पिंपरी-चिंचवड: भोसरी येथील महावितरणच्या स्पाईन सिटी उपविभाग क्रमांक २ कार्यालयात कार्यरत असलेल्या सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि त्यांचे ओळखीचे खाजगी इसम श्यामलाल असोकन (वय ३४) यांना ₹२५,००० लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, त्यांचे काम महावितरणकडील लायझनिंग आणि वीज कनेक्शनच्या मंजुरीशी संबंधित आहे. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकासाठी घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची प्रक्रिया सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्या टेबलावर आली होती. या अर्जावर कार्यवाही करून मंजुरी देण्यासाठी नरवडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम ₹३५,००० लाच मागितली. या मागणीमुळे तक्रारदाराने २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली.

सापळा रचून रंगेहाथ कारवाई

तक्रारीच्या अनुषंगाने ४ जून २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नरवडे यांनी लाच रक्कम तडजोड करत ₹२५,००० वर आणली आणि ती रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार, ५ जून रोजी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे नरवडे यांनी तक्रारदाराकडून खाजगी इसम श्यामलाल असोकन याला लाच रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वात पार पडली.







