मेघालय: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या एका तरुण जोडप्यापैकी पतीचा मृतदेह खोल दरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, तर पत्नी अद्याप बेपत्ता आहे. राजा रघुवंशी (वय २९) असे मृत पतीचे नाव असून, सोनम रघुवंशी ही २३ मेपासून बेपत्ता आहे. या रहस्यमय घटनेमुळे इंदूरपासून मेघालयपर्यंत चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे २१ मे रोजी शिलॉंग येथे पोहोचले आणि एका होमस्टेमध्ये त्यांनी चेक इन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनम आपल्या पतीसोबत रजिस्टरवर सही करताना दिसते. हा व्हिडिओ आता पोलीस तपासात एक महत्त्वाचा पुरावा ठरतो आहे. २३ मे रोजी हे दोघं चेरापुंजीजवळील ओसारा हिल्स परिसरात बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क झाला नाही.

कुटुंबीयांनी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कुटुंबीय मेघालयला रवाना झाले. तेथील शोधानंतरही दोघांचा ठावठिकाणा लागू न शकल्याने, परत इंदूरला जाऊन त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच, राजा आणि सोनम यांनी वापरलेली भाड्याची स्कूटर बेवारस स्थितीत सापडली. त्यानंतर तपास अधिकच खोलात गेला. अखेर, राजाचा कुजलेला मृतदेह खोल दरीत सापडला. तो परिसर अतिशय दुर्गम असल्यामुळे शोध मोहीम अत्यंत कठीण होती. मृतदेह ओळख पटवल्यानंतर त्याला इंदूरला परत आणण्यात आले आहे.

दरम्यान, सोनम अजूनही बेपत्ता असून तिचा कसून शोध सुरू आहे. सोनमचा भाऊ मेघालयमध्ये पोहोचला असून, त्याने या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी विशेष पथके तयार करून सोनमचा शोध सुरू ठेवला आहे. स्थानिक नागरिकांची मदत घेतली जात असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला जात आहे.
दरम्यान, या घटनेने एक वेगळेच वळण घेतले, इंदूरमध्ये राजाच्या घराबाहेर एक रहस्यमय पोस्टर लावण्यात आले. त्यात लिहिले होते “राजाचा आत्मा सरकारला आवाहन करतो, मी मेलो नाही, मला मारले. सीबीआय चौकशी करू द्या.” या पोस्टरमुळे संशयाची सुई कोणाकडे तरी वळत असल्याचे स्पष्ट होते. राजाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवावा, अशी मागणी केली आहे. सोनमचा भाऊ म्हणतो, “आम्हाला संशय आहे की या घटनेमागे कुठलं तरी षडयंत्र आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करावी.”
या घटनेचा मेघालयमधील पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या घटना पर्यटकांमध्ये भीती निर्माण करतात. त्यामुळे पोलीस विभाग विशेष सतर्क झाला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील प्रत्येक शक्यतेचा तपास केला जात असून, सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजा आणि सोनम यांच्या कुटुंबीयांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भावना व्यक्त करताना सोनमच्या भावाने म्हटले, “आम्हाला फक्त न्याय हवा आहे. सोनम जिथे कुठे असेल, ती सुरक्षित परत यावी, हीच आमची प्रार्थना आहे.” सध्या सोनमचा शोध सुरू असून, हे अपहरण आहे की काही वेगळे षडयंत्र? आत्महत्या की घातपात? या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. अनेक प्रश्न अनुत्तरित असून, सत्य काय आहे याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. राजाच्या मृत्यूमागील सत्य आणि सोनमच्या बेपत्तेपणामागील कारण पुढील तपासातून उघड होईल, अशी अपेक्षा संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे.







