बीड: सासरच्यांच्या सततच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात घडली आहे. शुभांगी संतोष शिंदे (वय अंदाजे २५ ते ३० वर्षे) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि तिच्या माहेरी शोककळा पसरली आहे.

शुभांगीच्या आत्महत्या करण्याचं कारण सांगत सासरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप माहेरच्यांनी केला आहे. शुभांगीच्या वडिलांनी व चुलत्यांनी सांगितले की, “सासरकडून आधीच चार लाख रुपये दिले होते, मात्र तरीही अजून दोन लाख रुपये मागून शुभांगीला त्रास दिला जात होता, मुलीला तिचा नवरा, सासू-सासरे आणि ननंद मिळून मानसिक त्रास देत होते. तिने आम्हाला सगळं सांगितलं होतं. ती पुण्याला जॉबसाठी जायला उत्सुक होती, पण तिचा काटा काढण्यात आला. आम्ही आधीच चार लाख रुपये नंदेच्या दुकानासाठी दिले होते.”
या घटनेनंतर शुभांगीचा मृतदेह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. मात्र नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या स्पष्ट शब्दांत मागणी आहे की, “जोपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही आणि आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.” या घटनेमुळे गीता गावात खळबळ उडाली असून, नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. “शुभांगीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या सासरच्या मंडळींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तिच्या आत्म्याला न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

या प्रकरणी पोलीस अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. घटनेच्या गंभीरतेवरून पोलीस विभागाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शुभांगीच्या कुटुंबीयांनी केली आहे.








