मुंबई : आगामी दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ या मोहिमेंतर्गत आतापर्यंत तब्बल १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निकृष्ट, संशयास्पद आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, सात दुकाने आणि आस्थापना तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहा प्रशासकीय विभागांमध्ये एकाच वेळी तपासणी आणि कारवाई करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या काळात सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान यापूर्वीच ९.११ कोटी रुपयांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला होता. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळखोरी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याला मोठी मागणी असते. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील तीन उत्पादकांकडून तयार करण्यात आलेला १ हजार ३३६ किलो खवा संशयास्पद आणि भेसळयुक्त असल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली. सुमारे ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा हा खवा MH 25 AJ 4023 क्रमांकाच्या वाहनातून पुणे-पंढरपूर मार्गे साताऱ्यातील व्यापाऱ्यांना पुरवण्यासाठी नेला जात होता.

सोलापूर FDA झोन-२ च्या पथकाने माळशिरस येथे संबंधित वाहनावर छापा टाकला. तपासणीदरम्यान खव्याची वाहतूक उघड्यावर आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत केली जात असल्याचे आढळले. तसेच अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. मानवी आरोग्याला संभाव्य धोका टाळण्यासाठी जप्त करण्यात आलेला संपूर्ण खवा खड्ड्यात पुरून नष्ट करण्यात आला.

दिवाळीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना नागरिकांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि विक्रेत्यांची विश्वासार्हता याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी FDA कडून राज्यभर तपासणी आणि कारवाई सुरू आहे.






