Shyamchi Aai Krutadnyta Sohla : पिंपरी : शिक्षक हा विवेकीच असला पाहिजे. आजच्या मूल्यहीन राजकारण अन् संस्कृतीच्या अध:पतनाच्या काळात आई-वडील आणि शिक्षक यांच्यावर नवी पिढी, संस्कृती घडविण्याची जबाबदारी आहे. सर्व धर्मांच्या चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे भारतीय संस्कृती होय, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे शनिवारी (ता. ४) व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्यामची आई’ कृतज्ञता सोहळ्यात पुरस्कार प्रदान करताना सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच टाटा मोटर्स उद्योगसमूहाचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी रहाटणी येथील भिकोबा तांबे मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक गणेश काळे यांना ‘श्याम’ आणि त्यांच्या मातोश्री द्रौपदाबाई शंकरराव काळे यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर ‘सानेगुरुजी विचारसाधना’, वि. दा. पिंगळे, सायली संत या उपक्रमशील शिक्षकांना ‘सानेगुरुजी शिक्षक प्रतिभा’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चिखली येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल या शाळेला ‘सानेगुरुजी संस्कारक्षम शाळा’ सन्मान प्रदान करण्यात आला.
या वेळी बोलताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “आंतरभारती ही विलक्षण संकल्पना राबविणारे सानेगुरुजी हे निधर्मी व्यक्तिमत्त्व होते; मात्र या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी हा सामाजिक कलंक आहे. गीता हा सर्व विश्वाचा धर्मग्रंथ आहे; तर शुद्ध इस्लाम, शुद्ध ख्रिस्ती धर्म यांमध्ये चांगली शिकवण आहे. नव्या जगात वावरताना सर्व धर्मांचे उत्तम संस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षक हा विवेकीच असला पाहिजे. देश, पालक, शाळा अन् विद्यार्थी यांचे चारित्र्य निष्कलंक असलेच पाहिजे. विश्वनागरिक घडविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. श्यामची आई हा मायच्या काळजाचा सोहळा आहे अन् माणसातील माणूसपण जपण्याचे काम सानेगुरुजी पुरस्कार करीत आहेत.!”
गिरीश प्रभुणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “श्यामची आई आणि प्रत्येकाची आई यामध्ये तसूभरही फरक नसतो. अराजकतेच्या काळात महाराष्ट्र घडविणाऱ्या जिजाऊ माँसाहेब, संस्कृतीचे पुनरुत्थान करणाऱ्या अहल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, चापेकर बंधूंच्या दुर्गाबाई चापेकर, सावरकर बंधूंच्या पत्नी अशा असंख्य मातांचे योगदान आपल्याला विसरता येत नाही; कारण त्यांच्या त्यागातून देश उभा राहिला आहे. दुर्दैवाने संस्कार घडविणारी श्यामची आई आता घराघरांतून दुर्मीळ होत चालली आहे. यासाठी सानेगुरुजींच्या विचारांसोबत ज्ञानेश्वरी, गाथा आणि पसायदान ही संतांची शिकवण जोपासली पाहिजे.”
वृक्षपूजन करून तसेच शिवान्या संत या चिमुरडीने म्हटलेल्या “खरा तो एकचि धर्म…” या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी – चिंचवड विभाग अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले; तसेच पुरस्कारार्थींशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी डॉ. अशोक नगरकर यांनी, “तुम्ही जे क्षेत्र निवडता त्याच्याशी प्रामाणिक राहा, अशी शिकवण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिली होती!” अशी आठवण जागवली. गणेश काळे यांनी, “संस्कार ही खूप मोठी श्रीमंती आहे!” असे मत मांडले; तर द्रौपदाबाई काळे यांनी, “चार मुले, सुना आणि नातवंडे यांच्यासह एकत्रित कुटुंबात राहताना खूप आनंद वाटतो!” अशी भावना व्यक्त केली. मनोहर पारळकर यांनी, “चांगल्या गोष्टी समाजात पोहोचविण्याचे काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने करीत आहे!” असे गौरवोद्गार काढले.
बाजीराव सातपुते, सुरेश कंक, अरुण गराडे, वर्षा बालगोपाल, प्रभाकर वाघोले, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.