पिंपरी : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे बहुतांश भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही रात्र भर झालेल्या पावसामुळे शहरातील श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे. शहरात रात्र भर पावसाचा जोर असून पावसामुळे पवना नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी मंदिर आणि परिसरात पाणी शिरले.
मंदिरात शिरलेले पाणी पहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पावसामुळे वल्लभनगर भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून भुयारात एक एसटी बंद पडली असल्याची माहिती मिळत आहे. तर चिंचवड येथील केशवनगर परिसरात नदी पात्रातील पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.