युनुस तांबोळी
शिरूर, (पुणे) : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर मैदानापेक्षा शौचालयाच्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला होता. त्यातून नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यासाठी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात भक्ष म्हणून ठेवलेल्या कोंबडीचा पिंजऱ्यात तडफडून मृत्यू झाला. वनविभागाचे दुर्लक्षाने बिबट जेरबंद नाहीच पण भक्षाचा तडफडून मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण वाढले आहे.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यातून सध्या पावसाने हजेरी लावल्याने बिबट प्रवण क्षेत्रातील बिबटे मानववस्तीकडे फिरकू लागली आहेत. पिंपरखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर, मैदानात व शौचालय परीसरात बिबट्याचा वावर वाढला होता. त्यातून त्याच्या पायाचे ठसे या ठिकाणी आढळून आले होते.
लहान लहान चिमुरड्या मुलांना शाळेत कसे पाठवायचे. नागिरकांमध्ये देखील भितीचे वातावरण तयार झाले होते. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातून या वनविभागाने शाळेपासून काही अंतरावर पिंजरा लावला होता. बिबट्या सहजतेने या पिंजऱ्यात जेरबंद व्हावा. यासाठी वनविभागाने या पिंजर्यात भक्ष म्हणून कोंबडी ठेवण्यात आली होती. हे भक्ष रात्री ठेवून सकाळी पिंजऱ्यातून बाहेर काढणे अपेक्षीत होती. मात्र दुसऱ्या दिवशी देखील या पिंजऱ्यातून कोंबडीला बाहेर काढले नाही.
गुरुवारी (ता. २८) दुपारी जोरदार झालेल्या पावसाने पिंजऱ्यात पाणी साचून कोंबडीचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर देखील मृत कोबंडी शुक्रवारी (ता. २९) त्या पिंजऱ्यातच होती. रस्त्याने जाणारे येणाऱ्या नागरिकांना हे निर्दशनास आल्यावर नागरिकांनी वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याची वाढलेली दहशत असताना देखील वनविभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने अनेक समस्यांना सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तत्काळ या भागात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करा. शाळेतील मुलांवर कोणतेही संकट ओढावले जाऊ नये यासाठी काळजी घ्या. अन्यथा शिरूर वनविभागावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष शरद बोंबे व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माऊली ढोमे यांनी दिला आहे.