Pune News: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे शहरातील प्रमुख सरकारी रुग्णालय मानले जाते. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील हजारो नागरिक उपचारासाठी या रुग्णालयावर अवलंबून असतात. मात्र, सध्या या रुग्णालयातील अस्वच्छता आणि गैरप्रकारांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील वॉर्ड, कॉरिडॉर आणि स्वच्छतागृहांमध्ये घाण साचल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. पाहणी केली असता भिंतींवर गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसल्या. अनेक ठिकाणी कचरा साचलेला होता. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयाच्या परिसरात रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. वॉर्डच्या कोपऱ्यात आणि इतर ठिकाणी अशा बाटल्या दिसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे दारूच्या बाटल्या आढळणे गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रुग्णालय परिसरात मद्यपी येतात का आणि सुरक्षारक्षक याकडे लक्ष देतात का, असा सवाल नागरिक करत आहेत. या प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रुग्णालयात स्वच्छता राखावी, सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






