पुणे: पुण्यात एक संतापजनक घटना (Pune News) मोशी परिसरातून समोर आली आहे. अवघ्या दोन हजार रुपयांच्या शुल्लक मागणीसाठी चार तरुणांनी एका वृद्ध महिलेच्या घरावर विटा फेकल्या. “आम्ही या भागाचे भाई आहोत,” असे सांगत या टोळक्याने मध्यरात्री संजय गांधी नगर परिसरात चांगलाच राडा केला.

शुक्रवारी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा स्वागत गायकवाड, अमोल लोखंडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी सनिगुरू दीपसिंग गोत्रा यांच्या घराबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या टोळक्याने फिर्यादीच्या आईकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. एका वृद्ध महिलेने पैसे देण्यास नकार दिला, हाच या तथाकथित ‘भाईं’चा सर्वात मोठा अपमान ठरला. याच रागातून त्यांनी घराच्या दिशेने विटा फेकण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात खिडकीच्या काचा फुटून वृद्ध महिलेच्या ओठाला गंभीर दुखापत झाली आहे.

आरोपींनी केवळ हल्लाच केला नाही, तर परिसरात उघडपणे फिरून “आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही” असे म्हणत वृद्ध महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.








