पुणे : बीआरटी मार्गात अनेकदा खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. बऱ्याचदा अपघात होतात. आतापर्यंत अशा अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. असे अपघात टाळण्यासाठी शहरातील चार बीआरटी मार्गांमध्ये घुसखोरी करणाऱ्या तब्बल ४४ हजार ९८६ वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. वाहनचालकांकडून तब्बल ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) सात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू केले आहेत. यातील पिंपरी-चिंचवड हद्दीत चार आणि पुणे हद्दीत तीन बीआरटी मार्ग आहेत. या मार्गावरून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. दिवसाला ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात.
पण, बीआरटी मार्गात होणाऱ्या खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. यासाठी शहरातील बीआरटी मार्गात खासगी वाहने घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. सातत्याने नियमभंग करणाऱ्या २५०० चालकांचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिसांनी परिवहन विभागाला पाठवला आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने १ जानेवारी ते ३० ऑगस्टदरम्यान अशा ४४ हजार ९८६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या चालकांकडून ३ कोटी १० लाख ४१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. बीआरटीत मार्गात घुसखोरी केल्यास पहिल्या वेळेस ५०० रुपये, पुन्हा तीच चूक केल्यास १५०० रुपये दंड वसूल केला जातो. दंड आकरूनही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. तीन ते चार वेळा दंड भरूनही घुसखोरी करणाऱ्या चालकांची संख्या जास्त आहे.
सातत्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना शिक्षा व्हावी, यासाठी सलग तीन वेळा नियम भंग केल्यास वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड परिवहन विभागाला पाठविण्यात आला आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी दिली.