पुणे : तांत्रिक कारणामुळे पुणे मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक (लाईन-1) आणि वनाझ ते रुबी हाॅल मेट्रो स्थानक (लाईन -2) या मार्गावरील मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ वाजता ऐवजी सकाळी ७ वाजता म्हणजे एक तास उशीराने सुरू होणार आहे. हा बदल केवळ रविवारी (ता. १०) एका दिवसासाठी आहे. सोमवारपासून मेट्रो सेवा नियोजित वेळेनुसार सुरु राहील, अशी माहिती पुणे मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे मेट्रो १ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण केले होते. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सुकर होत आहे.
दरम्यान, मेट्रोच्या तिकिटाचे दर १० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. प्रत्येक स्थानकांपर्यंत तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत. दर दहा मिनिटांना मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे. सध्या प्रवाशांच्या सेवेत १३ मेट्रो आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मेट्रो सेवा सुरु असते.