Pune Crime : पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरातील म्हाळुंगे येथे एका जिममध्ये स्वच्छतेच्या कारणावरून सुरू झालेला वाद हिंसक हाणामारीत बदलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाला मारहाण करून जखमी करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला आहे.

ही घटना 19 मार्च रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास व्हीटीपी बेलएअर हाउसिंग सोसायटीच्या पार्किंग परिसरात घडली. जखमी तरुणाची ओळख वैभव प्रदीप लिटोरिया (वय 28, रा. म्हाळुंगे) अशी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिममध्ये स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत दोन गटांमध्ये वाद झाला होता. नॅपकिनचा वापर न केल्यावरून हा वाद सुरू झाला आणि त्यातून दोघांमध्ये वैर निर्माण झाले.
वादानंतर रात्री उशिरा आरोपी विवेक भारंबे आणि त्याच्या एका साथीदाराने वैभव लिटोरिया यांना पार्किंगमध्ये अडवले. त्यानंतर त्यांच्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी धारदार वस्तूनेही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात लिटोरिया यांच्या कपाळावर आणि ओठांखाली जखमा झाल्या आहेत.

घटनेनंतर जखमी अवस्थेत लिटोरिया यांनी बावडन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून छोट्या कारणावरून वाद वाढून गंभीर स्वरूप धारण केल्याची चर्चा सुरू आहे.







