पुण्यातील (Pune) पिंपरी येथे आरटीईद्वारे प्रवेश घेत असताना बनावट कागदपत्रे जोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांनी रहिवासी पुरावा म्हणून बनावट कागदपत्रे दिली होती. दरम्यान, खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिक्षण विभागाकडून 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे येथील माताळवाडी भूगाव येथे जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडला होता. याप्रकरणी मुळशीच्या गट शिक्षण अधिकारी सुजाता देशमाने यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
आरटीईद्वारे प्रवेश मिळावा म्हणून पालकांनी बनवत दस्तावेज सादर केले होते. परंतु शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. या 18 पालकांवर बनावट कागदपत्रे जमा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी पालकांनी 25 टक्के अंतर्गत प्रवेश मिळून जावा म्हणून त्यांच्या मुलांचे खोटे रहिवासी पुरावा सादर करून प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सांगळे, रुपेश सावंत, दिगंबर सावंत, चंदन शेलार, कुंभराम सुतार, मंगेश गुरव, विवेक जोरी, उमेश शेडगे, सचिन भोसले, खंडू बिरादार, रामकृष्ण चोंधे, सुमित इंगवले, विजय जोजारे, मंगेश काळभोर, रोहिदास कोंढाळकर, श्रीधर नागुरे, बाबासाहेब रंधे, विलास साळुंखे या 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.
आरटीई अंतर्गत काही खासगी शाळांमध्ये आत्तापर्यंत सुमारे 950 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. दरम्यान, 18 पालकांनी खोटी माहिती देऊन प्रवेश मिळवला आहे. दरम्यान, या आरोपी पालकांची नावे समोर आली आहेत. परंतु आणखी किती पालकांनी बनावट रहिवासी दाखले सादर केले पोलिस याची शक्यता तपासात आहे.