पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील सांगवी परिसरात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याच्यावर पिस्तुल रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अमोल अण्णासाहेब वीर (वय 33) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे 12 वाजता विशालनगर, पिंपळे निलख येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. अमोल वीर हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी सायली काळूराम लांडगे हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. या विवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप अमोल यांनी केला आहे.

तक्रारीनुसार, संदीप तानाजी लांडगे आणि रोहन अर्जुन लांडगे यांनी अमोल यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर संदीपने लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. तसेच हातासह शरीराच्या इतर भागांवरही कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात अमोल गंभीर जखमी झाले. त्यांचे भाऊ अनिकेत सदाशिव वीर आणि दीपक नानासाहेब वीर यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हल्ल्यादरम्यान रोहन लांडगे याने संदीपला पिस्तुल काढण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर संदीपने कमरेला लावलेले पिस्तुल बाहेर काढून अमोल यांच्या दिशेने रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोल यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काशीनाथ लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील विविध कलमांनुसार कारवाई सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.







