Pimpri Crime | पिंपरी, (पुणे) : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बांधकाम साइटवर जाणार्या वाहनांमधून स्टील चोरणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींकडून १८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथील परिसरात ही कारवाई केली आहे.
निजाम नवाब खान (वय-५८, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. बैंगणवाडी, गंवडी, मुंबई), शत्रुघन महाबल ठाकुर (वय-६०, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे, मूळ रा. पुराबजार, ता. सदर, जि. आयोध्या, उत्तरप्रदेश), इसराल अहमद आबेदअली शेख (वय-३२, रा. तळेगाव दाभाडे, मूळ रा. बैराहपुर, ता. फतेपुर, उत्तरप्रदेश), महंमद आरीफखान (वय- ४०, रा. धारावी, मुंबई. मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावर लिंबफाटा, तळेगाव दाभाडे येथे काहीजण ट्रकमधून स्टील काढून घेत आहेत. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, त्यांच्याकडून तीन लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचे ६ हजार ३१० किलो वजनाचे लोखंडी सळईचे बंडल आणि १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा १८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.