Pimpri-Chinchwad Politics : महापालिका निवडणुका जवळ येत असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जात आहेत. प्रभाग क्रमांक २३ मधून भाजपचे तिकीट हवं असलेल्या कांचन अमोल जावळे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरळ ५० टक्के सवलतीत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मुलांच्या सायकली, पिठाची गिरणी अशा अनेक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.

महागाई वाढलेल्या काळात या वस्तू अर्ध्या दरात मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसादही मोठा दिसतोय. या सवलतीच्या माध्यमातून मतदारांमध्ये ओळख वाढवण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न जावळे दाम्पत्य करत असल्याचं दिसत आहे.
”शंभरच्या आसपास सायकली विकल्या जात आहे”
कांचन जावळे यांचे पती अमोल जावळे यांनी सांगितलं की, “हा उपक्रम चांगला चाललाय. लोकांना स्वस्तात चांगल्या वस्तू मिळतायत, त्यामुळे प्रतिसादही मोठा मिळतोय. आतापर्यंत २०० हून जास्त लोकांनी बुकिंग केलंय. रोज शंभरच्या आसपास सायकली जात आहेत. महागाईच्या काळात लोकांना यातून मदत होतेय.”

“आम्हाला भाजपचं तिकीट नक्की मिळेल”
त्यांनी पुढे सांगितलं की, “आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आम्हाला शब्द दिलाय—काम करत राहा, तिकीट मिळेल. आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला भाजपचं तिकीट नक्की मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”







