आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर (Indapur News) तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे पाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन भावांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी बुद्रुक येथे सुजित नरुटे यांच्या शेतातून आरोपी ज्ञानदेव नरुटे यांच्या शेतात पाणी गेले होते. याच रागातून ज्ञानदेव नरुटे यांनी सुजित नरुटे आणि त्यांच्या चुलत भावाला सुरुवातीला शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी ज्ञानदेव नरुटे यांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दगड फेकून मारला. या हल्ल्यात सुजित नरुटे यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
मारहाण केल्यानंतर आरोपी ज्ञानदेव नरुटे यांनी दोघांनाही जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी संबंधित व्यक्तींनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.







