पिंपरी : कधी काळी श्रीमंत महापालिका असा लौकिक मिरवलेली पिंपरी-चिंचवड महापालिका कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. विविध बँकांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची बचत ठेव असताना कर्जाचे डोहाळे लागले आहेत. प्रशासकीय राजवटीत नदीसुधारसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारल्यानंतर आता मोशी रुग्णालय, पुणे-मुंबई महामार्ग, पादचारी मार्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी ५५० कोटी रुपयांचे कर्ज महापालिका घेणार आहे.
महापालिकेला सुमारे एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच बांधकाम परवानगी, अग्निशामक विभाग ना-हरकत दाखला, आकाशचिन्ह विभागासह विविध माध्यमांतून उत्पन्न मिळते. वस्तू व सेवाकरापोटी (जीएसटी) शासनाकडून अनुदान मिळते. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. विविध बँकांमध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या बचत ठेवी असताना प्रशासकीय राजवटीत कर्ज घेण्यावर भर दिसून येत आहे.
महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या राजवटीतच पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीसुधारसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्यात आले. मात्र, त्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेला व्याज भरावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आता मोशीत हरित रुग्णालय उभारणे, पुणे-मुंबई महामार्ग, टेल्को रस्त्याचे सुशोभीकरण, पादचारी, सायकल मार्ग उभारण्यात येणार आहे. ही कामे महापालिका कर्ज काढून करणार आहे. त्यासाठी विविध बँकांकडून कमी व्याजदराने मुदत कर्ज घेण्यात येणार आहे. १२ ते १५ वर्षे कालावधीसाठी कमी व्याजदराने कर्ज मिळावे, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी निविदा नोटीस प्रसिद्ध केली आहे.