पिंपरी : मोक्का गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपीला अखेर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.15) रिव्हररोड सुभाषनगर येथील झुलेलाल मंदीराजवळ करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जतिन उर्फ सोनू टाक (वय-29 रा. रिव्हर रोड पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अवैध शस्त्र वाळगणाऱ्यांविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गुन्हे शाखेकडून मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अजित सानप यांनी रेकॉर्डवरील, मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी सोनू टाक त्याच्या कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याचे फिर्याद दिली.
त्यानुसार कारवाई करत सुभाषनगर येथील झुलेलाल मंदीराजवळ गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल सोनू टाकला लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला. आरोपी सोनू टाक विरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, आर्म अॅक्ट, दुहेरी मोक्का असे एकूण 16 गंभीर गुन्हे आहेत.
गेल्यावर्षी गणपती विसर्जनात रोहित वाघमारे याच्यासोबत भांडण-मारामारी करुन पिस्टल रोखून सोनू टाकने त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा पासून तो फरार होता. या गुन्ह्यात सोनू टाक याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात सोनू टाक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.