पिंपरी : सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 17) उघडकीस आली. तळेगाव दाभाडे परिसरात सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरात एका सार्वजनिक शौचालयात असलेल्या कचऱ्यात अर्भक असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पुरुष जातीचे अर्भक असून, त्याचे वय एक दिवस एवढे असल्याचा अंदाज आहे. अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्याला अशाप्रकारे टाकून देण्यात आले होते. याप्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.