पिंपरी : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी स्थानकांपासून सुमारे १० किलोमीटर परिसरात नियमित फीडर बस सेवा सुरू करावी, अशी सूचना आमदार शंकर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच वाकड मेट्रो स्थानकाला पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, सांगवी, निगडी, रावेत आणि आळंदी परिसरातील बससेवेशी जोडण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

आमदार जगताप यांनी नुकताच माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या. मेट्रोचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी त्यांनी मेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विविध उपाययोजना सुचवल्या.
मेट्रो स्थानकांपासून जवळच्या निवासी आणि व्यावसायिक भागांपर्यंत पोहोचण्यासाठी नियमित फीडर बस सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच मेट्रो स्थानकांजवळ बहुमजली स्वयंचलित पार्किंग व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाकड मेट्रो स्थानकाला प्रमुख वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेट्रो स्थानकांना निवासी व व्यावसायिक भागांशी जोडण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे संरक्षित स्कायवॉक उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. बस आणि मेट्रोचे मार्ग, वेळापत्रक, थेट लोकेशन तसेच प्रवासाचा खर्च यांची माहिती एकाच ठिकाणी देणारे प्रवास नियोजन ॲप विकसित करण्याची गरजही त्यांनी मांडली. मेट्रो आणि फीडर बससाठी एकत्रित तिकीट व सवलतीचे पास उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली.
प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांचा नियमित आढावा घेण्यासाठी मेट्रो-प्रवासी समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. पादचारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि सायकलस्वारांसाठी स्थानक परिसर अधिक सुरक्षित व सुलभ करण्यावरही भर देण्यात आला आहे.
या सर्व सूचनांचा संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून मेट्रो सेवा अधिक प्रभावी, प्रवासीस्नेही आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.







