पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याला दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी वाघेरे आणि अजित पवार एकमेकांसमोर आले आणि वाघेरे थेट अजित पवार यांच्या पाया पडले. लग्नाच्या व्यासपीठावर अजित पवारांचा आशीर्वाद घेतल्याने वाघेरे यांना अजित पवारांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? अशी चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे काल पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्याला रात्री उशिरा एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधू-वरास आशीर्वाद देण्यास व्यासपीठावर आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला.
मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. 2019 ला झालेल्या निवडणुकीत महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. हाच पराभव अजित पवारांसह पार्थ पवारांच्या जिव्हारी लागला होता.
मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग आप्पा बारणे यांचा महायुतीत प्रचार करताना दिसत आहेत. असं असताना त्यांच्या काही महिन्यापूर्वीचे खंदे समर्थक तसेच 2024 चे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुका पूर्वी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.