पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी समलैंगिक विवाहासाठी अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज केला आहे. येत्या 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी दोघींनी केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे.

दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली होती. पोलीस होण्याचे स्वप्न घेऊन दोघी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाल्या आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पूर्ण केल्यानंतर पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघींची मुख्यालयात नियुक्ती होती. त्यावेळी त्या इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वास्तव्यास होत्या.

यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात दोघींची एकाच ठिकाणी नियुक्ती झाली. त्यातून त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि कालांतराने त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. या नात्याची माहिती त्यापैकी एका महिलेच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी या संबंधांना विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे.

कुटुंबीयांनी विवाहाला विरोध करण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा दोघींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विषय असल्याने प्रशासनाकडून विवाह रोखण्याऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दोघींनी विवाहासाठी पोलीस ठाण्यात अधिकृत सुट्टीचा अर्ज साद केला असून, त्यासोबत लग्नपत्रिकाही जोडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलीस दलात चर्चेत असलेले त्यांचे नाते आता अधिकृतपणे समोर आले आहे.
एका महिला पोलिसाकडून लिंगबदलाशी संबंधित उपचार सुरू
या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या उपचारांसाठी ती मुंबईतील रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या उपचारांचा प्रस्तावित विवाहावर किंवा सेवा नियमांवर नेमका काय परिणाम होईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील आणखी एका महिला कर्मचाऱ्यानेही शासनाची परवानगी घेऊन लिंगबदलाची शस्त्रक्रिया केल्याची माहिती आहे. संबंधित कर्मचारी बीड येथून जिल्हा बदलीने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात दाखल झाली होती. शस्त्रक्रियेनंतर आपली सेवा नोंद पुरुष पोलीस कर्मचारी म्हणून करण्यात यावी, अशी मागणी तिने शासनाकडे केली आहे. मात्र, पोलीस भरतीच्या वेळी महिला उमेदवार म्हणून मिळालेल्या सवलती आणि आरक्षणाचा विचार करता सेवा नोंदीत बदल करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येते.
दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विवाहाचा निर्णय आणि दुसरीकडे लिंगबदलानंतर सेवा नोंदीत बदल करण्याचा प्रश्न यामुळे पोलीस प्रशासनासमोर बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर नवे कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत.







