लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर ते पाटस दरम्यान धावणाऱ्या पीएमपीएमएल (PMPML) बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पीएमपीएमएल चालकाने बस थेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरवरून पाटसच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशांची नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. या गर्दीचा आणि गडबडीचा फायदा घेत एका अज्ञाताने बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील मौल्यवान सोन्याचे दागिने शिताफीने लांबवले. काही अंतरावर गेल्यानंतर आपल्या गळ्यातील दागिने गायब असल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ आरडाओरड करत चालक आणि वाहकाला (कंडक्टर) घटनेची माहिती दिली.

महिलेने आरडाओरड केल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर थांबवली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

चोरटा बसमध्येच दडून बसला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तातडीने बसचे दोन्ही दरवाजे बंद करून सर्व प्रवाशांना आतच थांबवले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रत्येक संशयित प्रवाशाची, त्यांच्याकडील बॅगांची आणि साहित्याची कसून तपासणी सुरू केली आहे.







