मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह, अश्लील आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या पोस्टमधून चाकणकर यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. चाकणकर कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी एसआयटी, ईडी आणि पोलिसांकडून या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत कोणतीही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर बाब आढळली नसल्याचा त्यांचा दावा आहे.

असे असतानाही राजकीय हेतूने आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर खोटे आरोप आणि आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, डॉ. आशा मिरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील ठोंबरे, काँग्रेसच्या संगीता तिवारी, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यासह अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री समदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, योगेश सावंत आणि मोहसीन शेख यांच्यासह इतर दोघांचा समावेश आहे.
विनापुरावा बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात रूपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोशल मीडिया पोस्ट, संबंधित खाती आणि या प्रकरणातील इतर संशयितांचा तपास सुरू केला आहे.








