डॉ. अशोक बालगुडे

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) मतभेद आता उघडपणे चव्हाट्यावर आले असून, ‘महायुती धर्मा’ची भाषा करणाऱ्या दोन्ही पक्षांमध्ये पत्रयुद्ध रंगले आहे. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य केल्याच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी रोखणे हा केवळ पक्षीय संघर्ष नसून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या विकासकामांवर होत असल्याचा दावा टिंगरे यांनी केला आहे. आगामी काळात अन्य नगरसेवकांबाबतही अशीच भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

महापौर-उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य केले. त्यावेळी निधी आणि समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, अंदाजपत्रकातील निधीवाटप आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेत राष्ट्रवादीला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा आरोप पत्रातून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यानंतरही प्रश्न कायम असल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेण्यात आली आहे. विकासकामांना सहकार्याची भूमिका कायम ठेवत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान संधी द्यावी, अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे.
महायुती सत्तेत असताना स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणाचे हे पत्रयुद्ध केवळ पक्षांतर्गत कुरघोडीपुरते मर्यादित राहणार की त्याची किंमत पुणेकरांच्या विकासकामांना मोजावी लागणार, हा खरा प्रश्न आहे.








