लोणावळा, (पुणे) : दोन बालकांसह महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व लोणावळा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून पोलिसांनी दोन बालकांसह एका महिलेची सुटका केली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने लोणावळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार लोणावळा पोलिसांनी राज सिद्धेश्वर शिंदे (वय – २५, रा. क्रांतीनगर, कुसगाव) व ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे (वय – ४१, रा. क्रांतीनगर, कुसगाव) यांना अटक केली आहे. तर एकूण दहा जणांच्या या टोळीमध्ये दोन विधीसंघर्षग्रस्त बालक, तीन महिला, पाच पुरूष असून त्यांच्यापैकी दोन पुरूष आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना येरवडा पुणे येथील बाल निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. तर इतर सहा आरोपींचा शोध सुरु आहे. अशी माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना लोणावळा परिसरातील क्रांतीनगर येथील एक टोळी हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांना मारहाण करून लुटमार करतात. तसेच त्यांनी एक अल्पवयीन मुलगी व एका महिलेस पळवून आणून त्यांना मारहाण करून डांबून ठेवून त्यांच्याकडून काम करून घेत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस तपास करीत असताना पोलिसांनी ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे आणि राज शिंदे याला रविवारी (ता. १७) ताब्यात घेतले. या वेळी तपासात राज याने साथीदारांच्या मदतीने सहारा ब्रीज जवळ फिरण्यास आलेल्या पर्यटकांना चाकू व कुऱ्हाडीने मारहाण करत जबरदस्तीने त्यांचे कपडे, मोबाईल व रोख रक्कम चोरी केल्याचे कबूल केले. तर राज शिंदेजवळ मिळून आलेला मोबाईल हा त्याच घटनेतील असल्याचे त्याने सांगितले. सदर महिलेची राज शिंदे याच्या घरातून सुटका करण्यास गेले असता पोलिसांना आणखी दोन बालके कोंडून ठेवलेली सापडली. या तिघांची पोलिसांनी सुटका केली.
दरम्यान, राज शिंदे याची त्याची पत्नी इतर साथीदारांच्या मदतीने लोणावळा स्टेशनच्या बाहेर मोटार सायकलवर मुलांना जबरदस्तीने बसवून पळवून आणून घरात साखळीने बांधून डांबून ठेवले. लहान मुलीला उपाशी ठेवून घरातील काम करायला लावून हाताने, सळईने मारहाण केली तसेच तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलास मारहाण करून त्यास डांबून ठेवून त्याच्याकडून देखील कामे करून घेतली. पिडीत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी संपर्क करून तीच्या आईच्या फिर्यादीवरून पोक्सो ॲक्ट सह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार अतुल डेरे, राजू मोमीण, दिपक साबळे, विक्रम तापकीर, राहुल बुबे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, दता तांबे, पोना संदिप वारे, तुषार भोईटे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अक्षय नवले, प्राण येवले, निलेश सुपेकर, काशिनाथ राजापूरे तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, पोलीस हवालदार जयराज पाटणकर, पोलीस नाईक हनुमंत शिंदे, अजिज मिस्त्री, भुषण कुवर, विरसेन गायकवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कारंडे, पोलीस हवालदार कवडे, मुंडे, होळकर, खैरे, कदम, पंडीत, तुरे, गवळी, मपोहवा आश्विनी शेंडगे, मपोकॉ रिया राणे, यांनी केली असून पिडीत महिला व अल्पवयीन मुलीचे गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग हे करत आहेत.