Khadakwasla Dam : खडकवासला, (पुणे) : खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण १०० टक्के म्हणजे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून आज मंगळवारी (ता. २५) संध्याकाळी ५ वाजता धरणातून १ हजार क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
राज्यभरासह पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा जनावरे असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सुचना देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पुण्याला पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे लवकरच खडकवासला धरण भरण्याची शक्यता आहे. नदी काठच्या लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.