पिंपरी-चिंचवड : अपघातग्रस्त टेम्पोचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार देहूरोड- निगडी रोडवर आज (दि. ०२) बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात संबंधित प्रसार माध्यमांच्या पत्रकारांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसार माध्यमांचे दोन पत्रकार वार्तांकन करून पिंपरी- चिंचवडच्या दिशेने निघाले होते. तेव्हा देहूरोड- निगडी रोडवर भरधाव टेम्पो ( एम.एच. १४ जी.डी. ३३०३ ) दुभाजकाला धडकून पलटी झाला. अपघात समोरच घडल्याने पत्रकारांनी दुचाकी थांबवत घटनेचे वार्तांकन करत मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. यावेळी टेम्पो चालक आणि मालक यांनी अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.
दम्यान, या घटनेप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात टेम्पो चालक आणि मालकाचा शोध देहूरोड पोलीस घेत आहेत. ही सर्व घटना वाहतूक पोलिसांसमोर घडली आहे. पोलिसांसमोरच ही घटना घडल्याने पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.