पिंपरी : इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ऐतिहासिक ‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२२’ ची ‘‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’’ मध्ये नोंद करण्यात आली असून ही तमाम पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी माहिती अविरत श्रमदान संस्थेचे डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यासारख्या अनेक पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘रिव्हर सायक्लोथॉन-२०२२’’ चे आयोजन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सुमारे २० हजारहून अधिक नागरिकांनी अधिकृतपणे सहभाग घेतला. प्रत्यक्षपणे ३ हजाराहून अधिक सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले.
त्यामुळे सुमारे २५ हजार पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पार पडली, असे डॉ. निलेश लोंढे यांनी सांगितले.
डॉ. लोंढे म्हणाले की, पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने गेल्या ५ वर्षांपासून ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित करतो.
इंद्रायणी नदी स्वच्छता आणि वसुंधरा संवर्धन याबाबत जनजागृती हा मूळ हेतू आहे. यावर्षी ‘‘रि-सायकल-रि-यूज’’ ही थीम घेवून आम्ही सायकल रॅलीचे आयोजन केले होते.
… तर पुढच्या वर्षी पंतप्रधान मोदींना निमंत्रण
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, ‘पीएमआरडीए’ आयुक्त राहुल महिवाल यांच्या उपस्थितीमुळे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ लक्षवेधी ठरली. रॅलीतील नागरिकांचा प्रतिसाद आणि सायकलपटूंची गर्दी पाहता चंद्रकात पाटील यांनी पुढच्या वर्षी ५० हजार सायकलपटूंच्या उपस्थितीत ‘रिव्हर सायक्लोथॉन’ घ्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिंपरी-चिंचवडमध्ये निमंत्रित करुयात, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला केले. त्यामुळे संयोजन समितीला प्रोत्साहन मिळाले असून, पुढील वर्षी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ आणखी मोठ्या उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प केला आहे, असेही डॉ. निलेश लोंढे यांनी म्हटले आहे.