पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपोतील भीषण दुर्घटनेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केली. त्यापैकीच एक म्हणजे सनी अशोक माने (वय ३६) यांचे कुटुंब. घरी पत्नीने खास आवडीची बिर्याणी बनवून त्यांची वाट पाहत होती. काम संपवून सनी घरी जाण्याच्या तयारीतही होता. मात्र, “आज माझ्यासोबतच जेव,” असा मित्राचा आग्रह आल्याने तो कँटीनमध्ये थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले.

सनी माने हे मोशी येथील ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. मूळचे दिघी येथील असलेल्या सनी यांच्या पश्चात पत्नी कांचन, दोन लहान मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेला सनी गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुर्घटनेच्या दिवशी सनी घरी जेवायला येणार असल्याने पत्नी कांचन यांनी खास त्यांच्या आवडीची बिर्याणी बनवली होती. मात्र मित्राच्या आग्रहामुळे त्यांनी घरी जाण्याऐवजी कँटीनमध्येच जेवण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने, त्याच वेळी कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत जमीनदोस्त झाली आणि सनी ढिगाऱ्याखाली अडकले. चार दिवसांच्या अथक बचावकार्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पतीच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या पत्नी कांचन माने अश्रूंना आवर घालू शकत नव्हत्या. “तो त्या दिवशी घरी आला असता, तर आज आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं नसतं,” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली. दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले, तर वृद्ध आई-वडिलांनी आपला मुलगा कायमचा गमावला.
दरम्यान, दुर्घटनेनंतर चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या भेटीदरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.







