पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये एटीएममधून पैसे काढून बाहेर पडलेल्या पिकअप चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच अट्टल दरोडेखोरांना गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराबवाडी येथे १० ऑगस्ट २०२६ रोजी ही घटना घडली होती. एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून १ लाख ८ हजार रुपये काढून बाहेर पडलेल्या पिकअप चालकाला इर्टिगा कार आणि स्कूटीवरून आलेल्या आरोपींनी अडवले. पिस्तुलाचा धाक दाखवून तसेच मारहाण करून आरोपींनी चालकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटली आणि घटनास्थळावरून फरार झाले.

गुन्ह्याचा कोणताही थेट धागादोरा उपलब्ध नसताना गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील १२० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषण, सीडीआर आणि डंप डेटाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी संगमनेर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. सार्थक पोपट दाते, अजित बन्सी पारधी, सत्यवान सुनील देवकर, हनुमंत भास्कर दाते आणि यश सोमनाथ पवार, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी संगमनेर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कार, एक मोटारसायकल, छऱ्याची पिस्तुल, मोबाईल फोन आणि २४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. एकूण ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कोणताही ठोस धागादोरा नसताना १२० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, सीडीआर आणि डंप डेटाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट-४च्या पथकाला यश आले आहे.







