हनुमंत चिकणे
Haveli School News : लोणी काळभोर, (पुणे) : हवेली तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी सुसज्ज इमारती, सर्व प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा, चांगलं शैक्षणिक वातावरण असतानाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मागील काही दिवसांपूर्वी घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या तीन हजार विद्यार्थ्यांमधून अवघे वीसच विद्यार्थी चमकल्याचे दुर्दैवी चित्र पुढे आले आहे. ही हवेली तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रातील पिछेहाट मानली जात आहे. Haveli School News
शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत शिरुर, खेड व आंबेगाव तालुक्यांनी बाजी मारली असून, जिल्ह्यातील 13 तालुक्यांचा विचार करता हवेली तालुका गुणवत्ता यादीत शेवटून सहाव्या क्रमांकावर असल्याचे दिसुन आले. ही बाब हवेली तालुक्यातील राजकारणी, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांसाठी लाजिरवाणी आहे. सोशल मीडियापासुन थेट गावातील पारावर राजकारण, अर्थकारणाबरोबरच गप्पा झोडणाऱ्यांनी, राजकारण, अर्थकारणाबरोबरच आपआपल्या गावातील शैक्षणिक प्रगतीवर गप्पा झोडण्याची व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. Haveli School News
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत शिरुर, खेड व आंबेगाव तीन तालुक्यांनी यंदा बाजी मारल्याचे दिसुन येत आहे. तर हवेली तालुका खालून सहाव्या नंबरला आहे. हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळेमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, तेवढ्याच जोमाचे शिक्षक आहेत. मात्र, हवेलीतील शाळांची पिछेहाट का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
गुणवत्ता खालावल्याची कारणे शोधावी लागणार..
हवेली तालुक्यातील ३ हजार १६१ विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. यातील फक्त २० विद्यार्थी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. गुणवत्ता यादीत आलेले बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे असून, काही अपवाद वगळता विद्यालये व इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पिछेहाट झाली आहे. दरम्यान, गुणवत्ता इतकी का घसरली, हे शोधावे लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे हवेली तालुक्यातील शिक्षण पद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच शाळेतील शिक्षकांचे पितळही उघडे पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचे आहे. कारण येणारी पिढीचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे. Haveli School News
तक्रारी करूनही शिक्षकांवर कारवाई नाहीच..
पूर्व हवेलीमधील अनेक शिक्षक शाळेच्या वेळात फिरत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. रजेसाठी एकमेकांना मदत करणे, शाळेत वेळेवर उपस्थित न राहणे, शैक्षणिक कामाच्या नावाखाली इतरत्र फिरणे असे प्रकार जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत ज्यादा असल्याच्या तक्रारी पूर्वीपासून केल्या जात आहेत. मात्र, अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत असते. अशा प्रकारच्या तक्रारी मिळूनही, तालुका अथवा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शिक्षकांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने त्यांचे फावलेले आहे.
शाळेच्या वेळेत शिक्षक भलतीकडेच..
गटशिक्षण अधिकाऱ्यांपासुन थेट जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी देऊन, कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याची गरज असताना अधिकारी मात्र ‘आपले भले व आपले कार्यालय भले’ अशा अवस्थेत काम करत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. कामचुकार शिक्षकांवर कोणतीच कारवाईची केली जात नसल्याने शिक्षक शाळेच्या वेळेत फिरत असल्याचे चित्र हवेली तालुका पाहायला मिळत आहे.
गुरुजींना शिकवण्यापेक्षा राजकारणात अधिक रस..
पुर्व हवेलीमधील पुणे-सोलापुर रस्त्यालगतच्या एका शाळेतील एक शिक्षक दिवसभर या शाळेतून त्या शाळेत फिरत असल्याची चर्चा आहे. ‘आंधळं दळतंय अन् कुत्रे पिठं खातंय’ अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी कार्यालय सोडत नसल्याने कामचुकार शिक्षकांना आवर घालण्यात शिक्षणाधिकारी कमी पडत आहेत. त्यामुळे शाळेच्या वेळेमध्ये इतरत्र बाहेर फिरताना अधिकतर शिक्षक दिसून येतात. शाळेपेक्षा राजकारणात काही शिक्षकांना रस असल्याचे कितीतरी वेळा दिसून आले आहे. अशा शिक्षकांवर कारवाई केली जात नसल्याने राजरोसपणे हे प्रकार वाढत चालले आहेत.
शाळेच्या नियोजित वेळेत शिक्षकांची हजेरी नाहीच !
पूर्व हवेलीमधील अनेक शाळांमध्ये शासनाने दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिरा शिक्षक शाळेत हजेरी लावत असल्याचे चित्र सर्रास दिसुन येत आहे. शिक्षक येईपर्यंत काही शाळेतील विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून राहतात. त्यामुळे शिक्षक उशिरा आले तरी त्यांची नोंद कुठेही होत नाही. तसेच प्रशिक्षण, संघटनेच्या कामाच्या नावाखाली शाळा सोडून इतरत्र फिरणाऱ्या कामचुकार शिक्षकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही किंवा त्यांना कोणी विचारत नाही. यामुळे हवेली तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेची व शिक्षणाची अवस्था ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय’ अशी झाल्याचं म्हटलं जात आहे. Haveli School News