पुणे: शहरात आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 24 वर्षीय तरुण आणि तरुणीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाघोली पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाई केली आहे.
वाघोलीतील एका सोसायटीत 2 एप्रिल रोजी काही तरुण-तरुणी व्हिडिओ शूट करत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीनुसार, बिट मार्शल गणेश खाडे आणि किरण कांबळे तिथे पोहोचले. कर्तव्याचा भाग म्हणून चौकशी करण्याऐवजी त्यांनी संबंधित तरुण-तरुणीला थेट ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी वसुलीचा मार्ग निवडला. “सेक्स रॅकेटचा गुन्हा तुमच्यावर दाखल करू, तुझी नोकरी जाईल,” अशी धमकी हवालदार किरण अब्दागिरे यांनी दिली. इतकेच नाही तर तरुणाला मारहाण करून आणि तरुणीवर मानसिक दबाव टाकून त्यांना पुरते घाबरवून सोडले.
शेवटी, हे ‘प्रकरण मिटवण्यासाठी’ पोलिसांनी एका गॅरेजचा PhonePe QR Code वापरून 10,000 रुपये उकळले. मात्र, तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे हा सर्व प्रकार पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचला आणि खाकीतील या गुन्हेगारांचे पितळ उघडे पडले. अखेर पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. पोलिस हवालदार किरण अब्दागिरे यांच्यासह गणेश खाडे आणि किरण कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहेत.







