तेहरान: पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार असे वाटले असतानाच, पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. मध्यस्थी झाल्यानंतर अमेरिका-इराण शस्त्रसंधी अवघ्या काही तासांतच कोलमडली आहे. या तणावाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला असून, इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर होर्मुझचा मार्ग व्यापारासाठी खुला करण्यात आला होता. मात्र, इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच ठेवल्याने इराण संतप्त झाला आहे. “जोपर्यंत इस्रायल लेबनॉनमधील लष्करी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत या मार्गावरून एकाही तेल टँकरला जाऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा इराणने घेतला आहे. विशेष म्हणजे, इस्रायलचा दावा आहे की, लेबनॉन हा या कराराचा भाग नव्हता, ज्यामुळे परिस्थिती अधिक स्फोटक बनली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील ‘एनर्जी हायवे’ मानला जातो. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% तेलाची वाहतूक याच अरुंद मार्गातून होते. हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास भारत, चीन आणि युरोपातील अनेक देशांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने इराणचा हा निर्णय ‘अस्वीकार्य’ असल्याचे म्हटले असले, तरी इस्रायलच्या भूमिकेमुळे ट्रम्प प्रशासन पेचात पडले आहे. इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास महागाईचा भडका उडू शकतो, ज्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल.







