पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शासन अनुदानातून शालेय पोषण आहार पुरवला जातो. मात्र, पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या खिचडीत काचा, प्लॅस्टिकचे तुकडे आणि अळ्या आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असतानाही शालेय पोषण आहार देणाऱ्या संस्थांवर शिक्षण विभागाने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही.
तसेच, शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारींमुळे सावित्री महिला स्वयंरोजगार नावाच्या संस्थेकडून पुरविलेल्या भातात चक्क केस, अळ्यांसह काचेचा, प्लॅस्टिकचा तुकडा आढळून आल्याची गंभीर बाब समोर आली. याच संस्थेच्या शालेय पोषण आहाराबाबत वेगवेगळ्या सात शाळांमधून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
मात्र, अद्याप या संस्थेवर शिक्षण विभागाने काहीही कारवाई न केल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार दिला आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानातून हा शालेय पोषण आहार पुरविला जातो. महापालिका शिक्षण विभागाने एकूण २१ खासगी संस्थांना हा शालेय पोषण आहार पुरविण्याचे काम दिले आहे.
कस्पटे वस्ती ३९ प्राथमिक शाळा, मोहनगर लीलाबाई खिवंसरा प्राथमिक शाळा, २७,२ वाकड शाळा, भूमकर वस्ती प्राथमिक शाळा, सावित्रीबाई फुले शाळा मोहनगर आणि माध्यमिक विद्यालय काळभोर इ. शाळांमधून शालेय पोषण आहाराबाबत तक्रारी केलेल्या आहेत.